डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं काल दुपारी साडेबारा वाजता ओदिशा किनाऱ्याजवळ आय ए डी डब्लू एस अर्थात एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली.
या बहुस्तरीय स्वदेशी शस्त्र प्रणालीमध्ये जमिनीतून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, कमी पल्ल्याची प्रगत हवाईसंरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आय ए डी डब्लू एस च्या यशस्वी चाचणी बद्दल डी आर डी ओ, सशस्त्र दलं तसंच उद्योग क्षेत्राचं अभिनंदन केलं.
या चाचणीमुळं देशाची हवाई संरक्षण क्षमता आता अधिक बळकट झाली असून, महत्त्वाच्या स्थळांच्या सुरक्षेसाठी शत्रूच्या हवाईहल्ल्यांवर मात करण्याची आपली संरक्षणसिद्धता अधिक विकसित होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी या यशस्वी उड्डाण चाचणीत सहभागी सर्व पथकांचं अभिनंदन केलं.