वस्तू आणि सेवा करातले बदल देशातल्या नागरिकांना फायद्याचे ठरावे म्हणून केले आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. तमिळनाडूत तुतिकोरिन इथं काडेपेटी आणि फटाके उत्पादक संघटनेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. या क्षेत्राला आवश्यक पाठबळ देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कर पुनर्रचनेत ३७५ वस्तूं आणि सेवांवरचा कर कमी झाला आहे असं सांगून त्या म्हणाल्या, २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट सरकारने ठरवलं आहे.
जीएसटी करपुनर्चनेचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने रेल्वेने बाटलीबंद पाण्याच्या कमाल विक्री दरात कपात करायचं ठरवलं आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून रेलनीरची एक लीटरची बाटली १५ ऐवजी १४ रुपयांना तर अर्धा लीटरची बाटली १० ऐवजी ९ रुपयांना मिळेल.
या नवीन कररचनेत घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत अनेक बदल झाले आहेत. दूरचित्रवाणी संच, एअर कंडिशनर, डिशवॉशर यांसारख्या वस्तुंवरचा कर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या सुधारणांमुळे उपकरणांची मागणी वाढून देशांतर्गत उत्पादकांना बाजारपेठेत वाव मिळेल. तसंच, या उपकरणांसाठी लागणाऱ्या वायरिंग, कूलिंग सिस्टम, एलईडी पॅनेलचे पुरवठादार आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी देखील ही नवी कररचना लाभदायक ठरणार आहे.
या अंमलबजावणीत काही अडचणी आल्या तर ग्राहकांना तक्रार दाखल करता येईल. त्याकरता केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने खास ग्राहक मदत दूरध्वनी क्रमांक सुरु केला आहे. इनग्राम म्हणजेच एकात्मिक तक्रार निवारण यंत्रणेच्या पोर्टलवर हा मदत क्रमांक उपलब्ध असेल. वाहनं, बँकिंग, ई कॉमर्स, ग्राहकोपयोगी वस्तू आणि उपकरणं अशा विविध वर्गातल्या कर आकारणीसंदर्भातल्या तक्रारी या मदत क्रमांकावर नोंदवता येतील. १९१५ या क्रमांकावर देशातल्या १७ विविध भाषांमधे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध राहील.