खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत ३ लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. या कारवाईत ४१८ जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसंच राज्यातल्या सुमारे एक हजार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले.
रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्यवेळी खतं उपलब्ध व्हावीत तसंच खतांची साठेबाजी रोखण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाब, ओदिशा या राज्यात छापेमारी करण्यात आली. या कारवाईमुळे खतांचा कृत्रिम तुटवडा आणि किमतीत केलेले फेरफार रोखता येतील.