समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूजचा विषय अत्यंत गंभीर असून या दोन्ही बाबींवर तसंच एआयनिर्मित आक्षेपार्ह आशयांवरही कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज लोकसभेत म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. समाज माध्यमांचा उपयोग करून एक समांतर परिसंस्था तयार होत असून त्याद्वारे भारतीय संविधानाला आणि कायद्यांचं पालन न करण्याकडे कल दिसून येतो, त्यावर कठोर नियम बनवण्याची गरज असल्याचंही वैष्णव यावेळी म्हणाले.
देशभरातली जवळपास शंभर टक्के रेशन कार्डं आता डिजिटल रुपात तयार झाल्याची माहिती केंद्रीय अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जात असून ही योजना २०२९पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जोशी यांनी यावेळी दिली.