डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सर्वत्र उत्साह

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज संपूर्ण देशभरात तसंच जगभरातल्या अनेक देशांमध्ये उत्साहानं साजरा होत आहे. “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” ही या वर्षीच्या योग दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशातला मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत थोड्याच वेळात सुरू होत आहे. योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी वचनबद्ध रहा, आपल्याबरोबरच इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

जगभरात विविध देशांमध्ये आज १०वा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर इथं भारतीय वाणिज्य दूतावासाने योग दिनाच्या एक दिवसीय सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात एकाच वेळी १० हजार नागरिकांनी योगासनं केली.

नेपाळची राजधानी काठमांडू इथं असलेल्या भारतीय दूतावासानं पतंजली योगपीठाच्या संयुक्त विद्यमाने पोखरा शहरात योग दिनाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात योगाभ्यास तज्ञांनी विविध योग प्रकार दाखवून त्यांचे फायदेही सांगितले. गंडकी प्रांताचे मुख्यमंत्री सुरेंद्र राज पांडे यांनी योगसाधना ही निरोगी जीवनासाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं. नेपाळचे भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी योग दिनाचा हा सोहळा भविष्यात नेपाळ आणि भारत यांच्यातील पर्यटन विकासासाठी सहाय्यक ठरेल, असं यावेळी म्हटलं.

 

श्रीलंकेत हंबनटोटा इथल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने ऐतिहासिक अशा गाले किल्ल्यावर योग दिन साजरा केला. या सोहळ्यात ३०० नागरिकांनी सहभाग घेतला.

 

बांगलादेशमध्ये भारतीय उच्च आयोगातर्फे योग दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. भारतीय उच्च आयुक्त बिनोय जॉर्ज यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग अत्यंत लाभदायी असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं.