भाजपामधे प्रवेश केलेल्या अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर पावलं उचलणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करणं किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं हे असंवैधानिक आहे, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असं सावंत म्हणाले.
अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांना पक्षप्रवेश दिल्यामुळे भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते जालना इथं वार्ताहरांशी बोलतत होते. अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी कोणाशाही चर्चा न करता भाजपाशी आघाडी केली,त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं. मात्र, भाजपाने त्यांच्या नगरसेवकांवर कसलीही कारवाई केली नाही. उलट काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला. त्यामुळे त्यांची दुतोंडी भूमिका उघड झाली, असं सपकाळ म्हणाले.
अंबरनाथ नगरपरिषदेतल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित १२ नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा कार्यक्रम झाला.
भाजपासोबत युती केल्यानं काँग्रेसनं काल त्यांचं निलंबन केलं होतं. पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता थेट निलंबनाची कारवाई केली, असा आरोप अंबरनाथ कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केला होता.