मतदार याद्या अधिकाधिक अचूक असाव्यात या उद्देशानं भारत निवडणूक आयोगानं मृतृविषयक नोंदी थेट भारताच्या महानिबंधकांकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना नोंदणीकृत मृत्यूंबद्दलची माहिती वेळेवर उपलब्ध होईल, तसंच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मृत्यूपश्चात नाव वगळण्यासाठीच्या अर्ज क्र. ७ ची वाट न पाहता प्रत्यक्ष भेट देऊन माहितीची पडताळणी करणं शक्य होईल.
मतदार माहिती विषयक चिठ्ठ्यांची संरचना बदलून, त्यावरची मतदाराचा अनुक्रमांक आणि भाग क्रमांक ही माहिती मोठ्या अक्षरात छापण्याचा निर्णयही निवडणूक आयोगानं घेतला आहे.
यासोबतच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदार पडताळणी आणि नोंदणी अभियानात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांना छायाचित्र असलेलं ओळखपत्र जारी करण्याचे निर्देशही आयोगानं दिले आहेत.