डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रला पुरस्कार

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्रासोबत जम्मू आणि काश्मिर तसंच झारखंडलाही पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जातील.

 

राज्यस्तरीय पातळीवरही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. उत्कृष्ट निवडणूक अधिकारी, उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतदानासाठी उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट मतदार सुविधा अशा विविध श्रेणींतर्गत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नंदूरबार, लातूर, अकोला, गडचिरोली, हातकणंगले, मुंबई उत्तर पूर्वच्या  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झालेत. विधानसभेसाठी नवापूर, करवीर, पालघर, सिल्लोड, मलकापूर, ब्रह्मपुरी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गौरवलं जाणार आहे. टपाली मत पत्रिकेच्या उत्कृष्ट देवाणघेवाणीसाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार होईल.