महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदवार बिनविरोध आहेत. उद्या निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल.
दरम्यान, काही ठिकाणचे अर्ज बाद झाल्यानं काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मालेगाव महानगरपालिकेत प्रभाग सहा मध्ये प्रतिस्पर्धी पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने इस्लाम पार्टीच्या उमेदवार मुनीरा शेख या बिनविरोध निवडून आल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे तीन आणि भाजपाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या महानगरपालिकेत बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवरांची संख्या आता आठ झाली आहे.
जळगाव महानगरपालिकेतल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने प्रभाग क्रमांक १२ ब मधल्या भाजप उमेदवार उज्ज्वला बेंडाळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
धुळे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक १७ ब मध्ये दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या उमेदवार सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. याआधीच दोन उमेदवार बिनविरोध निवडले गेल्यामुळे धुळ्यातून भाजपच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड होत आहे.येत्या 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी होणार आहे.