पालघर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काल अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून उमेदवार आणि पक्षांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये झालेल्या सभेत केलं. शिंदे यांनी डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा इथं आज जाहीर सभा घेतल्या.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आहे. २०२९ पर्यंत या पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. गडचिरोली इथं भाजपच्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
लोकशाही पायदळी तुडवून राज्यात बिनविरोध निवडणुका होत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर निवडणुका पारदर्शक होतील का असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षातील उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी केली असा आरोप करत महायुतीला पराभूत करण्याचं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सपकाळ यांनी आज बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.