बिहार विधानसभा निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी आज जाहीर होणार आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणूक याच मतदार यादीच्या आधारावर होतील. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आज दुपारपर्यंत मतदार याद्या उपलब्ध होतील.
मतदार यादीच्या प्रती सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना, आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. तसंच सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना देखील अंतिम मतदार याद्या दिल्या जातील.
बिहारमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेनंतर यंदाच्या १ ऑगस्ट रोजी मतदार याद्यांचा मसुदा प्रकाशित झाला होता. यामध्ये आपले गणना अर्ज सादर करणाऱ्या ७ कोटी २४ लाखापेक्षा जास्त मतदारांची नावं समाविष्ट करण्यात आली होती.
२०२४ च्या निवडणुकांमध्ये बिहारमधल्या मतदारांची संख्या ७ कोटी ८९ लाख इतकी होती. विशेष पुनरिक्षण प्रक्रिये दरम्यान यापैकी निधन झालेल्या, अथवा अथवा स्थलांतरित झालेल्या सुमारे ६५ लाख मतदारांची नावं वगळण्यात आली.
पुनरिक्षण प्रक्रिये दरम्यान, ३६ हजारापेक्षा जास्त मतदारांनी यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी दावे दाखल केले, तर २ लाख हजार १७ मतदारांनी आपलं नाव वगळण्यासाठी अर्ज केले. आवश्यक कागदपत्र सादर न केल्याबद्दल जवळजवळ ३ लाख मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. या नोंदी लक्षात घेऊन अंतिम मतदार यादी तयार करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली.