निवडणूक आयोगाने आजपासून एसआयआरचा म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून एकंदर ५१ कोटी मतदारांची पडताळणी या मोहिमेत केली जाणार आहे. या मतदारांची पडताळणी करून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. यापूर्वी बिहारमध्ये पडताळणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यात मतदारांच्या पडताळणीनंतर सात कोटी ४२ लाख मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुदुच्चेरी, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार तसंच लक्षद्वीपमध्ये मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. यापैकी तमिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी आणि पश्चिम बंगालमध्ये २०२६मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
आजपासून ४ डिसेंबरपर्यंत मोजणीचा टप्पा असेल. मतदार याद्यांचा पहिला मसुदा ९ डिसेंबरला प्रसिद्ध केला जाईल आणि ७ फेब्रुवारी २०२६ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. कोणताही पात्र मतदार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेणं, तसंच बेकायदा स्थलांतरितांसह अपात्र मतदारांची नावं वगळणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.