बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारादरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम सामग्रीचं प्रकटीकरण आणि जबाबदार वापराबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बनवलेली अथवा बदल केलेली प्रतिमा, ऑडिओ संदेश अथवा दृकश्राव्य संदेश प्रचारासाठी वापरताना त्यावर ए-आय निर्मित, डिजिटली वर्धित अथवा कृत्रिम सामुग्री, असा स्पष्ट उल्लेख करणं, तसंच प्रदर्शित केल्या जाणाऱ्या प्रचार सामुग्रीच्या १० टक्के भागात स्पष्टपणे हा संदेश देणं बंधनकारक असेल. या प्रचार सामुग्रीमध्ये मेटाडेटा किंवा त्याबरोबरच्या संदेशात त्याच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या घटकाचं नाव ठळकपणे उघड करणं बंधनकारक राहील.
राजकीय पक्षांनी मतदारांची दिशाभूल करण्याच्या अथवा त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कोणतीही बेकायदेशीर सामुग्री, अथवा एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्याची ओळख, स्वरूप अथवा आवाज चुकीच्या पद्धतीने सादर करू नये, अथवा फॉरवर्ड करू नये असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे.
नव्या नियमावलीनुसार राजकीय पक्षांना अशी कोणतीही सामग्री ३ तासांच्या कालावधीत काढून टाकावी लागेल, तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं बनवलेल्या प्रचार साहित्याची अंतर्गत नोंद ठेवणं बंधनकारक राहील.