बिहारमधल्या मतदार याद्या पुनरिक्षणाच्या प्रक्रीयेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत सांगितलं की मतदारयाद्यांच्या पुनरिक्षण प्रक्रीयेत एक कोटीपेक्षा जास्त सरकारी कर्मचारी, १० लाखापेक्षा जास्त बूथ एजंट आणि २० लाखाहून जास्त मतदान एजंट सहभागी झाले होते. असं असताना मतांची चोरी कशी होऊ शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजकीय पक्षांचे एजंट प्रत्यक्ष प्रक्रीयेत सहभागी असूनही पूर्ण माहिती वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवत नसावेत अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
मतचोरीचा आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी अथवा आपल्याजवळच्या माहितीचं सत्यापन करणारं प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करावं असं ते म्हणाले.
निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत. कोणाचीही सत्ता असली तरी निवडणूक आयोग कर्तव्यात कसूर करणार नाही असं झानेश कुमार यांनी स्पष्ट केलं. मतदार याद्या पुनरिक्षणाची मागणी गेल्या २० वर्षांपासून अनेक राजकीय पक्ष करीत होते. त्यानुसार ही मोहीम सुरु केली असून इतर राज्यांमधेही लौकरच पुनरिक्षण करण्यात येईल असं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारच्या प्रारूप यादीतल्या त्रुटींसाठी सूचना हरकती येत आहेत. वैयक्तिक मतदारांच्या २८ हजार ३७० हरकती आल्या असून नव्यानं मतदानाचा अधिकार मिळालेल्यांचेही अर्ज येत आहेत. १ सप्टेंबरपर्यंत सूचना हरकती पाठवाव्या असं आवाहन त्यांनी केलं.