विकसित भारताचं परराष्ट्र धोरण महत्त्वाकांक्षी, दीर्घकालीन आणि क्षितीज विस्तारणारं हवं अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठात दीक्षांत समारंभात ते बोलत होते. जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल झाले असून अनेक नवी सत्ताकेंद्रं तयार झाली आहेत. त्यामुळं जागतिक पातळीवर भारताचं स्थान बळकट करण्यासाठी अधिकाधिक देशांना सोबत घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आज एखादा देश कितीही ताकदवान असला, तरी सगळ्याच बाबतीत तो आपलं म्हणणं इतरांवर लादू शकत नाही. व्यापार, शस्त्रबळ, संसाधनं, तंत्रज्ञान, प्रतिभा या विविध क्षेत्रांमध्ये ताकद या शब्दाच्या कितीतरी व्याख्या नव्याने तयार होत आहेत, असं ते म्हणाले.
पुण्यातल्या पुस्तक महोत्सवालाही त्यांनी हजेरी लावली. भारताचे परराष्ट्र धोरण आता पाश्चात्य विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्यता आणि संस्कृतीवर आधारित असायलं हवे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रामायण आणि महाभारत ही केवळ धार्मिक पुस्तकं नसून जागतिक राजकारणाचे धडे देणारी उत्तम मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. रामायणात श्रीरामांनी विविध शक्तींना एकत्र आणून केलेली मजबूत युती आजही विविध देशांना मित्रराष्ट्रांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणादायी आहे, असं ते म्हणाले. श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातले सर्वात मोठे आणि कुशल ‘मुत्सद्दी’ आहेत. हनुमानाने श्रीलंकेत केलेली शिष्टाई आणि श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धात केलेली रणनीती ही आधुनिक कूटनीतीची सर्वोत्तम उदाहरणे आहेत असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.