परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये व्यापार, उत्पादन, सागरी क्षेत्र, लोकांमध्ये होणारा संवाद या क्षेत्रात द्विपक्षीय सह
कार्य वाढवण्याबाबत फलदायी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, ऊर्जा आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संधींबाबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी हिंद- प्रशांत क्षेत्र आणि सध्याच्या जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया मधल्या विशेष धोरणात्मक भागीदारीला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दोन्ही देशांमध्ये मजबूत समन्वय आणि संबंधं असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे.
ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी आज दूरध्वनीद्वारे संवाद साधला. यावेळी युक्रेनमधल्या घडामोडी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.