राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी हैदराबादमधील राष्ट्रपती निलायम इथं आयोजित दुसऱ्या भारतीय कलामहोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन होणार आहे. संस्कृती, पर्यटन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयांच्या सहकार्यानं राष्ट्रपती भवनातर्फे आयोजित साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, हस्तकला यांचा संगम असलेल्या या दहा दिवसांच्या महोत्सवात गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा आदी राज्यांचा सहभाग आहे.
यावर्षी सुमारे दीड लाख लोक या महोत्सवाला भेट देण्याचा अंदाज आहे. नागरिकांना शनिवारपासून 30 तारखेपर्यंत या महोत्सवाला भेट देता येईल. यावेळी पारंपरिक हातमाग, हस्तकला आणि प्रादेशिक उत्पादनं खरेदी करण्यासह प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचाही आस्वाद घेता येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.