राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. या पुरस्कार सोहळ्यात, राष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीनं सेवा देणाऱ्या १५ परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला.
त्यात जळगाव जिल्ह्यातल्या कठोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका आणि मिडवाइफ सुजाता अशोक बागूल यांचा समावेश आहे. बागूल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १८ वर्षांच्या अतुलनीय आरोग्य सेवेसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. एक लाख रुपये रोख, आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आणि राज्य मंत्री प्रतापराव जाधव, अनुप्रिया पटेल, तसंच आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यावेळी उपस्थित होते.