ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनी केलं. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारानं राष्ट्रपतींनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात सन्मानित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. जगातल्या सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असून विकासाच्या या यात्रेत ऊर्जेची गरजही वेगानं वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आणि ऊर्जा बचतीचं महत्त्व अधोरेखित केलं.
ऊर्जेची बचत, नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा वापर यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करायलाही हातभार लागतो, ही बाब राष्ट्रपतींनी अधोरेखित केली. ऊर्जा संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी भारत सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातलं उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केल्याचं त्या म्हणाल्या. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल, ऊर्जा आणि नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर यावेळी उपस्थित होते.