राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल संध्याकाळी इम्फाळमधील सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या समारंभात 1 हजार 3 शे 87 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं. राष्ट्रपती कालपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
याप्रसंगी आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की उद्घाटन झालेल्या या प्रकल्पांमुळं रोजगार निर्माण होईल, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि आर्थिक उपक्रमांना गती मिळेल. मणिपूरच्या समावेशक विकासासाठी आणि राज्यातील लोकांच्या सक्षमीकरणाकरिता सरकारची वचनबद्धता या प्रकल्पांमधून प्रतिबिंबित होतं असंही त्या म्हणाल्या.
मणिपूरच्या लोकांना दुर्दैवी हिंसाचारानंतर झालेल्या वेदनांबद्दल दुःख व्यक्त करताना, राष्ट्रपती म्हणाल्या की सरकार प्रत्येक बाधित कुटुंबासोबत उभं आहे आणि मणिपूरच्या लोकांना वाटत असलेल्या चिंतांची काळजी घेणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे असं आश्वासन त्यांनी दिलं.