प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम आर श्रीनिवासन यांचं आज तामिळनाडूमधे निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. डॉक्टर श्रीनिवासन यांना भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. अणुऊर्जा विभागात सप्टेंबर १९५५ ला त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा च्या निर्मितीत डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचा सहभाग होता. १९५९ ला देशातल्या पहिल्या अणुऊर्जा केंद्रासाठी मुख्य प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पायाभूत सुविधांमधे झपाट्याने वाढ झाली. देशातल्या महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांच्या निर्मितीत त्यांचं मोठं योगदान होतं. श्रीनिवासन यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. श्रीनिवासन यांनी भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रातली पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे भारताचे ऊर्जा क्षेत्र आत्मनिर्भर व्हायला मदत झाली असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हणाले.