डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचं निधन

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांचं आज बेंगळुरू इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. ते १९९४पासून २००३ पर्यंत इस्रोचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. कस्तुरीरंगन यांनी पीएसएलव्हीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.तसंच, त्यांच्या कार्यकाळात चांद्रयानासारख्या मोठ्या मोहिमांचं नियोजन करण्याची सुरुवात झाली होती.

 

निवृत्तीनंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरणासारख्या विविध विषयांवर सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्म श्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी गौरवण्यात आलं होतं. डॉ. कस्तुरीरंगन यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली होती. १९७१ मध्ये अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेत काम करताना प्रायोगिक उच्च ऊर्जा खगोलशास्त्र या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती.

 

डॉ. कस्तुरीरंगन यांनी इस्रोचे प्रमुख म्हणून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या उत्क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी जे काम केलं, त्यामुळे पुढच्या पिढीच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरत असल्याची भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.