भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखों अनुयायी चैत्यभूमीवर दाखल

 

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत. या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह याबरोबरच विविध अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

शिवाजी पार्क इथं एक लाख चौरस फूट क्षेत्रफळावर वॉटरप्रूफ निवासी मंडपाचे सोय केली आहे. ज्यात अनुयायांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्थाही आहे. निवासी मंडपात दहा ठिकाणी मोठे एल ई डी स्क्रीन लावण्यात आले आहेत, त्यात अभिवादनाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. तसेच राजगृह इथं नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्षही स्थापन करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे फिरते कॅमेरे मेटल डिटेक्टर आदीची व्यवस्था करण्यात आली आहे. चैत्यभूमीपुढे नतमस्तक होण्यासाठी आंबेडकरी अनुयायांच्या लाटा आज सकाळपासूनच चैत्यभूमीवर धडकत आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी पार्क इथं दीपस्तंभ या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं.