ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. गेलं वर्षभर ते कर्करोगाशी झुंज देत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते समर्पित कार्यकर्ते होते. राज्यातल्या विविध नामांकित महाविद्यालयांमधे अध्यापन क्षेत्रात ठसा उमटवणारे डॉ मोडक सोविएत रशियासंदर्भातले तज्ज्ञ होते. बिलासपूर इथल्या गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी काम केलं होतं. विविध विषयांवरची ४० पुस्तकं त्यांनी लिहीली होती. १९९४ ते २००६ अशी सलग १२ वर्षं त्यांनी विधानपरिषदेत पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक मोडक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी मोडक यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.