माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा

भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

डॉ कलाम हे द्रष्टे वैज्ञानिक, प्रेरणादायी नेते आणि देशभक्त होते. त्यांनी संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रात, तसंच युवक सक्षमीकरणासाठी अथक प्रयत्न केले आणि देशाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणलं असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

डॉ कलाम यांच्या स्वप्नातल्या  बलशाली, आत्मनिर्भर आणि दयाशील भारताच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील  राहू ,असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

 

डॉ. कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मुंबईत राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मराठी पुस्तकांमधले लेख वाचले, तसंच काव्य वाचन सादर केलं . मंत्रालयात अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी डॉ कलाम यांच्या  प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन केलं. 

 

परभणी जिल्ह्यात कातनेश्वरच्या जिल्हा परिषद शाळेत “वाचन स्पर्धा” घेण्यात आली. सर्वात जास्त पुस्तकं वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. 

 

सांगली जिल्ह्यात “ऐतिहासिक संदर्भ मूल्य असलेल्या ग्रंथांचं प्रदर्शन” आयोजित करण्यात आलं आहे . तसंच वाचन प्रेरणा दिनानिमित्त सलग 12 तास वाचनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

 

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी डॉ कलाम यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.