भारतभर साजरा केला जाणारा दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याचं आंतरसरकारी समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं. केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली.
ही बातमी समजल्यावर देशात आणि जगभरातल्या भारतीय समुदायात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दीपावली हा केवळ सण नाही तर आपल्या संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांशी जोडलेली दृढ भावना असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर आनंद व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही या घोषणेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
यापूर्वी रामलीला, दुर्गापूजा आणि इतर अनेक भारतीय परंपरांचा तसंच पारंपरिक कौशल्यांचा समावेश या यादीत झाला आहे.