झोपण्याच्या बर्थची सोय असलेल्या दोन वंदे भारत गाड्या लौकरच प्रवाशांच्या सेवेत येतील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितलं. यातल्या एका गाडीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून दुसरीच्या चाचण्या १५ ऑक्टोबरच्या आसपास पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. १६ डब्यांची ही पूर्ण वातानुकूलित गाडी ताशी १८० किलोमीटर पर्यंत वेगाने धावू शकेल.
दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी १२ हजार विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येतील असं वैष्णव यांनी सांगितलं. १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर याकाळात ही सुविधा उपलब्ध राहील. यातल्या दीडशे गाड्या आवश्यकतेनुसार ऐनवेळी उपलब्ध करण्यासाठी तयार ठेवण्यात येतील, असं ते म्हणाले.