दीपावलीच्या प्रकाश पर्वातला बलिप्रतिपदेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. विक्रम संवत २०८२ पिंगलनाम संवत्सराचा प्रारंभही आज झाला. गुजराती नागरिकांचं नव वर्षही आजपासून सुरू झालं. पती-पत्नीच्या नात्याचा सण मानल्या जाणाऱ्या पाडव्यानिमित्त घरोघरी सजावट, फराळ आणि खरेदीची लगबग दिसत आहे. अनेक ठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांचं आयोजन झाल्यानं अनेक जण उत्साहात त्यात सहभागी झाले होते. नवीन वाहनं, कपडे, भेटवस्तू, मिठाई खरेदी करण्यासाठीही बाजारात गर्दी दिसत होती.
उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या गंगोत्री धामची कवाडं आज अन्नकुट सोहळ्यानंतर संपूर्ण हिवाळ्यासाठी बंद करण्यात आली. यानिमित्तानं मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती तसंच मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी गंगा मातेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या हंगामात गंगोत्री आणि यमुनोत्री धामला सुमारे १४ लाख भाविकांनी भेट दिली.
उद्या भाऊबीजेच्या दिवशी यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं बंद केली जातील.