दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल. व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या वर्षभराची खतावणी बंद करुन नवीन चोपडा सुरु केला जातो. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजारात आज मुहूर्ताच्या सौद्यांचं सत्र झालं. सत्र संपलं तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६३ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ४२६ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ८६९ अंकांवर बंद झाला.
बाजारपेठा, घरं आणि कार्यालयं आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली आहेत. सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण दिसत आहे. दिवाळीनिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत असून, घ रोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.
जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले भारतीय उत्साहात दिवाळी साजरी करत असून विविध जागतिक नेत्यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.