राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा हा सण अंध:कारावर प्रकाशाच्या, अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अर्धमावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे. देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
प्रकाशाच्या या उत्सवाने आपल्या सर्वांचं जीवन सलोखा, आनंद आणि समृद्धीने उजळून निघावं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवाळी शुभेच्छा देताना म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी रधाकृष्णन तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दिवाळीचा हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि प्रकाश घेऊन येवो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या सणाच्या निमित्तानं स्वदेशीचा अंगिकार करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि समाधान घेऊन येवो अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातल्या पूरग्रस्तांचं तसंच पुरानं बाधित शेतकऱ्यांचं जीवन पुन्हा उजळवण्यासाठी सर्वांनी एकदिलानं प्रयत्न करुया, असं आवाहनही त्यांनी केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वांच्या इच्छा पूर्ण होवोत अशी कामना करत दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.