दिल्ली-एनसीआर परिसरात येत्या १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान पर्यावरणपूरक हरित फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. फटाके फोडण्यासाठी सकाळी सहा ते सात आणि रात्री आठ ते १० या दरम्यानच वेळ देण्यात आली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी झाली.
या कालावधीत हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेचं निरीक्षण करण्याचे आणि १४ ते २१ ऑक्टोबर दरम्यान फटाक्यांमुळे दिल्लीच्या हवेवर होणाऱ्या परिणामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शासनाने निवडलेल्या फटाके विक्री केंद्रातूनच हरित फटाक्यांची विक्री करावी आणि त्यांची नियमित तपासणी संबंधित गस्त पथकाने करावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
एनसीआर बाहेरच्या कोणत्याही फटाक्यांना या परिसरात विक्रीला बंदी असेल आणि बनावट फटाके विकणाऱ्या किंवा नियम मोडणाऱ्या विक्रेता अथवा कंपनीचे परवाने तत्काळ निलंबित करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.