दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ होऊन कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झालं. दिशाच्या मृत्यूच्या एसआयटी चौकशीचा अहवाल त्वरित सादर करावा आणि सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे आरोप तिच्या वडिलांनी काल केले होते. त्यातल्या आरोपींची चौकशी करावी, गरज असेल तर त्यांना अटक करावी अशी मागणी आमदार अमित साटम यांनी केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करू, असं आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं.
या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांसह आरोप झालेल्या व्यक्तींना अटक करावी अशी मागणी नितेश राणे आणि शंभूराज देसाई यांनी केली. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्ष समोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केल्यानंतर कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झालं. तत्पूर्वी, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून सखोल आणि निःपक्षपाती चौकशी व्हावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केलं.