दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. दिशा सालियन प्रकरणात एसआयटीची स्थापना झाली आहे, सीआयडीने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दिला आहे. पण सत्ताधारी पक्ष या प्रकरणी सभागृहाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सालियन प्रकरणात राजकारण होत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब म्हणाले. यावेळी परब आणि भाजपाच्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
राज्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण येत्या एप्रिल महिन्यात जाहीर होईल असं, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE चा अभ्यासक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. या अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीनं मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरात दिली. या आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात विचार विनिमय सुरू असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार सुधारणा विधेयक कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधानपरिषदेत मांडलं. या नव्या कायद्यामुळे माथाडी कामगारांना कामगाराच्या व्याख्येतून वगळलं आहे, हा कायदा माथाडी कामगारांना उद्ध्वस्त करणारा कायदा असल्याची टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी विधेयकावरच्या चर्चेत केली. हे विधेयक पुन्हा एकदा संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावं अशी मागणी त्यांनी केली. शशिकांत शिंदे यांनीही विधेयकावर आपलं मत मांडलं.