भारत आणि युरोपिअन आयोगादरम्यान व्यापार, हरित ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्रातील भागीदारी संदर्भात काल नवी दिल्लीत चर्चा झाली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, स्वच्छ आणि हरित ऊर्जा, दळणवळण, नागरिकांमधील परस्पर संबंधातील भागीदारी वाढवण्यासाठी वचनबद्धता सुनिश्चित करण्यासाठी चर्चा झाली.
भारत आणि युरोपियन आयोगामधील धोरणात्मक भागीदारी गेली दोन दशकं जुनी असून त्याच्या मुळाशी विश्वास, लोकशाही मूल्यांवर आधारित प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत वचनबद्धता आहे. असं दोनही नेत्यांच्या चर्चेनंतर, जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. या चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्य वाढविण्यावर भर दिला. यावेळी हिंद प्रशांत महासागर प्रदेशात शांतता, सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धीबाबत एकमत झाल्याचं नमूद केलं.
भारतात सूफी परंपरेनं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील आयोजित जहां-ए-खुसरो सूफी संगीत महोत्सवाला संबोधित करताना काढले. पंतप्रधानांनी देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सूफी संगीत महोत्सवाचं रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. रुमी फाउंडेशननं आयोजित केलेला हा महोत्सव उद्यापर्यंत चालेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावर अर्थसंकल्पोत्तर चर्चासत्राला दुरस्थ माध्यमातून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात सर्व केंद्रीय मंत्री सहभागी होतील. पुढील आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसंच धोरणात्मक स्तरावर काय अपेक्षित आहे याबाबतच्या चर्चेत भागधारकांना सहभागी करून घेणं हा या वेबिनारचा उद्देश आहे. तसंच आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणाऱ्या NXTपरिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, न्यूजएक्स वर्ल्ड या वाहिनीची सुरुवात त्यांच्या हस्ते होणार आहे.