डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

अहमदाबादमध्ये काल कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स आज सापडला आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर Genx इंजिन असलेल्या बोइंग 787 विमानांची अतिरीक्त सुरक्षा चाचणी करण्याचे निर्देश हवाई वाहतूक महासंचालकांनी एअर इंडियाला दिले आहेत. अपघात स्थळावर आजही तपास आणि मदतकार्य सुरू आहे. न्यायवैद्यक तज्ञांनी आज अपघातस्थळी भेट देऊन सविस्तर तपासणी केली. 

याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून..

व्हाइस कास्ट

विमान दुर्घटनेचं नेमकं कारण अजून पर्यंत कळू शकलेलं नाही. या प्रकरणी आज मेघनी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली. विविध सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत. गुजरात एटीएसनं दुपारी घटनास्थळावरून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.  विमान पडलं त्या भागातल्या बेपत्ता असलेल्या स्थानिक नागरिकांचाही शोध सुरू आहे. 

आकाशवाणी बातम्यांसाठी अहमदाबादहून अपर्णा खुंट

 

या विमानातल्या २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं एअर इंडियानं आज जाहीर केलं. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी रुपाणी कुटुंबाची भेट घेऊन शोक व्यक्त केला . त्यापूर्वी त्यांनी अहमदाबाद सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

 

अपघातातून बचावलेले विमान प्रवासी रमेश विश्वासकुमार यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

 

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची डीएनएच्या मदतीने ओळख पटवण्याचं काम सुरू असून, ओळख पटलेले मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबांकडे सुपूर्द केले जात आहेत. आतापर्यंत ७ मृतदेह संबंधित कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात सध्या ३२ जणांवर उपचार सुरू असून गंभीररीत्या होरपळलेले काही रुग्ण वगळता अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी दिली आहे.

 

दुर्घटनेतल्या जखमींचे प्राण वाचवण्याच्या आशेनं अनेक जण रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येनं पुढाकार घेत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा