ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं आज दीर्घ आजाराने मुंबई इथे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. समाज माध्यमांवर कुमार यांच्या निधनाचं वृत्त प्रसृत झाल्याचं हिंदुस्थान समाचारने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
धीरज कुमार यांनी १९७० आणि १९८०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेकविध भूमिका केल्या. रोटी, कपडा और मकान, स्वामी, क्रांती, हिरा पन्ना अशा अनेक कलाकारांसोबत ते झळकले होते. हिंदीखेरीज त्यांनी पंजाबी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. दूरदर्शनवरच्या ओम नमः शिवाय, श्री गणेश, जय संतोषी मां आणि जप तप व्रत अशा मालिकांची निर्मितीही धीरज कुमार यांनी केली आहे.