सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह निकटवर्तीय उपस्थित होते.
६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ३०० हून जास्त चित्रपटांमधे भूमिका करणारे धर्मेंद्र यांनी १९६० मधे दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व आणि संवेदनशील चेहरा या वैशिष्ट्यांच्या बळावर धर्मेंद्र यांनी कविमनाच्या रोमँटिक नायकाच्या भूमिका साकारल्या, तसंच ॲक्शन हिरोच्या भूमिकांमुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘ही मॅन’ म्हणून प्रसिद्ध झाले. अभिनयात विनोदाची डूब देणारा त्यांचा नायकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
बंदिनी, हकिकत, शोले, गुड्डी, सीता और गीता, लोफर, यादों की बारात, चुपके चुपके, शोले, चाचा भतीजा, द बर्निंग ट्रेन, इन्साफ का तराजू, राम बलराम अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधे त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. आगामी इक्कीस या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे.
काही बंगाली आणि पंजाबी चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. छोट्या पडद्यावरही त्यांनी अनेक लोकप्रिय कार्यक्रमांमधे भाग घेतला. बॉलिवुडमधल्या कामगिरीबद्दल त्यांना फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता.
२००४ ते २००९ या काळात त्यांनी लोकसभेत बिकानेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांना पद्मभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं होतं.
अतिशय लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. कलाकारांच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली होती, घेत राहतील, या शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका महान पर्वाचा अंत झाल्याची शोकभावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या समाज माध्यमावर धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
१९६०च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून भारतीय प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या सिनेसृष्टीच्या धरम पाजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय सिनेजगताने आज एक लखलखता तारा गमावल्याची भावना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. अभिनेता अक्षय कुमार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.