केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. पुढची ६ वर्षं देशातल्या १०० आकांक्षित जिल्ह्यांमधे ही योजना राबवली जाईल. कृषी उत्पादकता वाढवणं, पीक बदल आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार तसंच पंचायत आणि विकासखंड स्तरावर सिंचन सुविधांमधे वाढ, अल्प आणि दीर्घकालीन पतपुरवठा इत्यादी उद्दिष्टं या योजनेत निर्धारित केली आहेत. सध्या राबवण्यात येणाऱ्या ३६ विविध योजनांबरोबरच स्थानिक आणि खासगी सहभागातून ही योजना राबवली जाईल.
अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ प्रवासाबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केला. भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक तयार करण्याच्या उद्दिष्टाकडे या मोहिमेमुळे पुढचं पाऊल पडलं असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणासंबंधी स्नायूंचं पुनरुज्जीवन, सूक्ष्म जीवांची वाढ, पिकांची शक्यता अशा विविध विषयातले प्रयोग शुक्ला यांनी अतराळ वास्तव्यात केले असून त्याचा भविष्यातल्या अंतराळ मोहिमांना उपयोग होईल असं ते म्हणाले.