मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात अनुकंपा तत्वावरील गट क, गट ड मधील तसंच राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या एकूण दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्तीपत्रं वितरीत करण्यात आली. प्रशासनाचं बळकटीकरण करण्याला सरकारचं प्राधान्य आहे, संस्थात्मकदृष्ट्या प्रशासनाला बळकट केलं तरच प्रशासन गतीशील, संवेदनशील आणि लोकाभिमुख होऊ शकतं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या दृष्टीनं अनुकंपा तत्वावरील शासन निर्णयात सुधारणा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अनुकंपा तत्वावरल्या ८० टक्के जागा भरल्या असून उरलेल्या जागा काही दिवसात भरल्या जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले.
तर नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी ई-गव्हर्नन्सचा वापर वाढवण्याचे, लोकाभिमुख कारभार करण्याचे आणि प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
दरम्यान, गडचिरोली, गोंदिया, धुळे, यवतमाळ, लातूर आणि हिंगोलीमधेही पालकमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा आणि सरळसेवा पदभरतीच्या २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.