पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ ९ टक्के होतं मात्र गेल्या दहा वर्षांत ते वाढून ५३ टक्के झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उदघाटन आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते.
ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे हे भारतीयांवर राज्य करण्यासाठी तयार करण्यात आले होते. ते लोकशाहीसाठी पोषक नव्हते. त्यामुळे नव्या कायद्यांची गरज होती, असं मुख्यमंत्री म्हणाले. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांत सामाजिक बदल झाले, गुन्ह्यांचं स्वरुप आणि गुन्हे घडण्याच्या पद्धती बदलल्या. त्यात तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला. त्यामुळे केंद्र सरकारने तीन नवे फौजदारी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.