केंद्रीय मंत्रीमंडळाने दिल्लीत झालेल्या कारस्फोटातील जीवितहानीबद्धल तीव्र शोक व्यक्त करणारा ठराव काल मंजूर केला. मंत्रिमंडळाने दोन मिनिटांचे मौन पाळले. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी सरकार कायमच वचनबद्ध असल्याचं आणि देशाच्या नागरिकांचं जीवन आणि कल्याण सुरक्षित करण्याच्या दृढ संकल्पाला मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा मान्यता दिली.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं या भ्याड हल्ल्याचा निषेध करत, या हिंसाचारातल्या बळी पडलेल्या शोकग्रस्त कुटुंबाप्रती मंत्रीमंडळानं संवेदना व्यक्त केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर, सर्व प्रकारच्या दहशतवादासंदर्भातल्या शून्य सहिष्णूता धोरणाचा पुनरूच्चार केला.या घटनेची चौकशी अत्यंत तत्परतेने आणि कुशल पद्धतीने केली जावी असे निर्देशही मंत्रीमंडळाने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.