November 12, 2025 7:58 PM | Delhi Blast

printer

दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांचे देशभरात छापे, मुंब्रा इथून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था – एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून, श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्यात घेण्यात आलं आहे. कुलगाममध्ये प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. या स्फोटात वापरण्यात आलेली कार गेल्या १० ते १२ दिवसांपासून फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये उभी होती, असं चौकशीदरम्यान समोर आलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. 

 

दरम्यान, या कार स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या स्फोटात वापरण्यात आलेली कार अमित नावाच्या डीलरकडून खरेदी करण्यात आली होती, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

या प्रकरणातली संशयित डॉ शाहीन शाहीद हिचा भाऊ परवेझ अन्सारी याच्या लखनौमधल्या घरावर उत्तप्रदेश एटीएसने कारवाई केली असून तिथून मोबाईल फोन्स सह इतर यंत्रसामुग्री जप्त केली. 

 

महाराष्ट्र एटीएस दहशतवादविरोधी पथकानं मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसनं सांगितलं.