लाल किल्ला इथल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे प्रमुख, दिल्ली पोलिस आयुक्त, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते. जम्मू आणि काश्मिरचे पोलीस महासंचालक या बैठकीला दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते.
लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत काल संध्याकाळी सातच्या सुमारास एक शक्तीशाली स्फोट झाला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.
दिल्लीतल्या स्फोटाला जबाबदार असलेल्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आज आयोजित केलेल्या संरक्षणविषयक कार्यक्रमात ते बोलत होते. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना सिंह यांनी आदरांजली वाहिली. ही घटना दुर्दैवी असून सरकारनं अतिशय गंभीर दखल घेतली आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये बातमीदारांना सांगितलं.
सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला मेट्रो स्थानक बंद ठेवल्याचं दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनं कळवलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारपर्यंत लाल किल्लाही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.