दिल्लीत हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयानं आज अनेक निर्देश दिले. शहरातली प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर असलेले ९ पथकर नाके तात्पुरते बंद करण्याचा किंवा दुसरीकडे हलवण्याचा तत्काळ विचार करावा, अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या पीठानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली. याबाबत एका आठवड्याच्या आत निर्णय घ्यावा आणि तो न्यायालयासमोर ठेवावा, असंही पीठानं सांगितलं.

 

तर, दुसऱ्या एका प्रकरणात, जास्त उत्सर्जन करणाऱ्या, १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल गाड्या आणइ १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल गाड्यांवर कारवाई करायला सर्वोच्च न्यायालयाच्या या तीन सदस्यीय पीठानं आज मंजुरी दिली.