दिल्ली राजधानी क्षेत्रातल्या हवेची गुणवत्ता एका आठवड्यात सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करायचे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नवी दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल आज झालेल्या चौथ्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या bhupeराज्यांनी तसंच महानगरपालिकांनी प्रदूषण कमी करण्यासाठी सुचवलेल्या कृती योजनांचा त्यांनी आढावा घेतला. या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी येत्या जानेवारीपासून दर महिन्याला मंत्रीस्तरीय बैठक घेण्याची घोषणा त्यांनी केली.
दिल्लीतल्या शाळांमधल्या १० हजार वर्गांमध्ये पहिल्या टप्प्यात हवा शुद्धीकरण यंत्रं बसवण्यात येणार असल्याची माहिती दिल्लीचे शिक्षणमंत्री आशिष सूद यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना दिली.
दरम्यान, उत्तर भारतात दाट धुक्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होण्याचा अंदाज नागरी उड्डाण मंत्रालयानं व्यक्त केला आहे.
धुक्याचा फटका विविध रेल्वेगाड्यांनाही बसला असून ६० गाड्या ५ तासांपर्यंत विलंबानं धावत असल्याची माहिती भारतीय रेल्वेनं दिली आहे.