जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अर्थात बीज सोहळा उद्या, रविवारी क्षेत्र देहू इथं होत आहे. यंदा तीनशे पंच्याहत्तरवा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गावात स्वच्छतेची कामे करण्यात आली असून इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे. सध्या देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी आणि इंद्रायणी नदीकाठी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत. नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी दिली. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड तर्फे देहू इथं जाण्यासाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.