संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या मोरोक्को दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रबात इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. या समुदायानं भारत आणि मोरोक्को या दोन्ही देशांच्या समृद्धीसाठी दिलेल्या योगदानाची त्यांची प्रशंसा केली. भारताच्या संरक्षण उद्योगानं दीड लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाचा टप्पा गाठला असून संरक्षण निर्यात २३ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे, असं संरक्षण मंत्री म्हणाले.
भारत आता शंभराहून अधिक देशांना संरक्षण साहित्याची निर्यात करत आहे, असं त्यांनी सांगितलं. या संवादादरम्यान, ऑपरेशन सिंदूर दरम्यान सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईचं भारतीय समुदायानं कौतुक केलं.
संरक्षण मंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशातले धोरणात्मक संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशातले संरक्षण, राजनैतिक आणि औद्योगिक सहकार्य बळकट करणं असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या दौऱ्यात दोन्ही देश संरक्षण सहयोग करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत.