दिल्लीत काल अयोध्येच्या धर्तीवर पहिल्यांदाच कर्तव्य पथावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सव हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून ती एक नवी पहाट असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या. श्रद्धा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम दर्शवणारी एक नवकथा निर्माण होत असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी जवळपास दीड लाखांहून अधिक दिवे उजळण्यात आले तर हजारो ड्रोनच्या माध्यमातून रामायण कथा साकारण्यात आल्या.
उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं आज शरयूतीरी दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. 26 लाख 11 हजार आणि 101 दिवे उजळून नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न यामधून केला जाणार आहे. शरयूतीरावरील 56 घाटांवर, 33 हजार स्वयंसेवकांकडून एकंदर 28 लाख पणत्या प्रज्वलित केल्या जाणार आहे. यंदाच्या वर्षी एकवीसशे वेदाचार्य लक्ष्मण किला घाट ते नया घाटपर्यंत भव्य आरती करून विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. तसंच अकराशे स्वदेशी ड्रोन अयोध्येचे आकाश रामायण दृश्यांनी भरून टाकतील. होलोग्राफिक लेसर शोमुळे उपस्थितांना आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळणार आहे.