डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम

गांधी जयंतीनिमित्त आज सर्वत्र स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्या निमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमवेत भाग घेतला. यावेळी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोबरधन योजनेअंतर्गत १५ बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे. 

 

अमृत-२ योजनेंतर्गत सातारा पालिकेच्‍या स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्‍पाचं तसंच नळजोडण्‍यांना अद्ययावत मीटर बसवण्‍याच्‍या कामाचं उद्घाटनही मोदी यांनी दूरस्‍थ पद्धतीनं केलं. स्‍वच्‍छता ही प्रत्‍येकाची जबाबदारी असून यासाठी प्रत्‍येकानं कार्यरत राहणं गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. ही राष्ट्रीय स्तरावरची मोहीम २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झाली. त्यामुळे ५ लाख ५४ हजार गावांना हगणदारीमुक्त गावांचा दर्जा मिळाला आहे. त्याचबरोबर ११ कोटी ६५ लाख घरगुती शौचालये बांधण्यात आली. २०१४ ते २०१९ या वर्षात अतिसारामुळे होणारे लाखो मृत्यू रोखण्यात आले आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. त्याचबरोबर स्वच्छतेमुळे माता आणि बालकांचा मृत्यू दर कमी झाला आहे. देशात या मोहिमेमुळे लाेकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन झाल्याचं मत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केलं आहे. 

 

मध्य रेल्वे विभागानं ‘ स्वच्छता ही सेवा ‘ उपक्रमांतर्गत राबवलेल्या स्वच्छता पंधरवड्याची आज सांगता झाली. या पंधरवड्यात मध्य रेल्वेनं स्वच्छतेशी संबंधित  विविध उपक्रम राबवले.