राज्यभरात आज दर्पण दिन साजरा होत आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने पत्रकारिता महाविद्यालयांसह विविध संस्था संघटना विविध कार्यक्रम आयोजित करत दर्पण दिन साजरा करत आहेत, तसंच बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन केलं. जांभेकरांनी मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचं कार्य केलं असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनेक पत्रकार आणि संपादकांनी दर्पण दिनानिमित्त भेट घेतली. यावेळी पवार यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्व पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या लेखणीतून वास्तव घटनांचं अचूक चित्रण करणं आणि समाजातल्या अनैतिक, अन्यायी प्रवृत्तीवर प्रहार करणाऱ्या पत्रकारितेचा वारसा आपल्या देशाला लाभला आहे, असं पवार म्हणाले.
अहिल्यानगर प्रेस क्लबच्या वतीनेही आज दर्पण दिन साजरा करण्यात आला.